
सावंतवाडी : माजगाव हरसावंतवाड्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या वनक्षेत्रात कामावर असताना एका व्यक्तीने आपल्याला मारहाणीची धमकी दिल्याबद्दलची तक्रार मळगाव वनरक्षक प्रकाश बालाजी रानगिरे (वय २७, रा. वनकर्मचारी वसाहत, सालईवाडा, सावंतवाडी) यांनी पोलिसांत दिली आहे.
या तक्रारीत रानगिरे यांनी म्हटले आहे की, वनक्षेत्र कार्यालय सावंतवाडी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वनक्षेत्रापैकी मळगाव उत्तर या वनक्षेत्राची रक्षा करण्यासाठी आपणास नेमलेले आहे. आपल्यासोबत सोबत वनरक्षक रमेश तानाजी पाटील आहेत. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी माजगाव हरसावंतवाड्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या वनक्षेत्रात तीन व्यक्ती मोटारसायकल (MH-07-N-4387)ने जंगलक्षेत्राकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आपण व आपले सहकारी रमेश पाटील यांच्यासह वनक्षेत्रपाल कार्यालय सावंतवाडी येथून माजगाव वन सर्व्हे क्र. ६७ च्या दिशेने जात असताना माजगाव हरसावंतवाडा येथील वनक्षेत्रामध्ये तीन व्यक्ती बसलेल्या दिसल्या. त्यापैकी एक इसम एका हातामध्ये कुऱ्हाडाचे पाते, दुसऱ्या हातामध्ये दांडा होता. त्यांनी आम्हाला पाहून जंगलक्षेत्राच्या खाली पळ काढला. त्यांना थांबविण्यासाठी आम्ही त्याचा पाठलाग केला. त्यावेळी ते थांबले. त्यांच्यापैकी हातात कुऱ्हाडीचा दांडा असलेल्या व्यक्तीने दुसऱ्याकडे हातातील कुऱ्हाडीचा दांडा फेकला. त्या तरुण व्यक्तीने तो दांडा उचलून आमच्या दिशेने चालत आला व ‘तू शंभोच्या दुकानाकडे ये तुझी कुऱ्हाडीनी टकली फोडतो’ व जीवच घेतो, अशी धमकी दिली व मोटारसायकल सुरू करून ते तिघेजण त्या मोटारसायकलवरून निघून गेले.
या घटनेदरम्यान सहकारी रमेश तानाजी पाटील यांनी त्यांच्या जवळ असलेला मोबाईलव्दारे त्यांचे फोटो घेतले. त्यानंतर आम्ही माजगाव गावात जाऊन गावातील लोकांना ते फोटो दाखवून माहिती घेतली असता त्यातील अक्षय भुजंग सावंत, रा. माजगाव, भुजंग भिकाजी सावंत, रा. माजगाव, जयराम कानसे, रा. हरसावंतवाडा, माजगाव अशी त्यांची नावे असल्याचे समजले. त्यांच्यापैकी आमच्या दिशेने दांडा घेऊन आलेल्या इसमाचे नाव अक्षय भुजंग सावंत व मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाचे नाव भुजंग भिकाजी सावंत असे असल्याची खात्री झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.