
सावंतवाडी : मळगाव येथील जत्रोत्सवाला दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या धोंडीराज उर्फ ओमकार बाळा राऊळ (२३, रा. मळगांव देऊळवाडी) या युवकाचे दुर्दैवी निधन झाले. गेले काही दिवस त्याच्यावर गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामूळे त्यांच्यापाठोपाठ एकुलत्या मुलाने साथ सोडल्याने राऊळ कुटुंबावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओमकार राऊळ, लवू रामकृष्ण राऊळ व अक्षय अशोक भगत (सर्व राहणार मळगाव) हे आपल्या दुचाकीने मळगांव येथील जत्रोत्सवाला जात असताना समोरून वेगात येणाऱ्या बोलेरो टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात ते तिघेही जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना उपचारार्थ सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गंभीर जखमी असल्याने यातील ओमकार याला गोवा बांबोळी येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यानंतर गेले काही दिवस तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
राऊळ कुटुंबिय मूळ मळगावचे असले तरीही ते मुंबईत वात्सव्यास होते. ओमकार हा शिक्षण घेत होता. जत्रोत्सवासाठीच तो गावी आला होता. मात्र, जत्रोत्सवाला मित्रांसोबत जात असतानाच झालेल्या अपघातानंतर त्याचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, बहिण, काका, काकी, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे.