रामदास स्वामी मठासाठी वैभव नाईकांच्या माध्यमातून १५ लाख मंजूर

खासदारांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 17, 2024 13:57 PM
views 51  views

मालवण : मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी  १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी जाधववाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ महिलांचा खा.राऊत, आ.नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


         यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले  वायरी जाधववाडी  येथे  रामदास स्वामींचा पुरातन मठ आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जातात. याच छत्रपतींनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग समोर हा मठ आहे. या मठाच्या बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. मठाचे काम कारण्याबरोबच  येथे येणाऱ्या पर्यटकांना या मठाची माहिती, दर्शन घेता यावे यादृष्टीने या मठाला पर्यटनाच्या माध्यमातून वेगळा दर्जा कसा मिळेल यासाठी येत्या काळात प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.


       आमदार वैभव नाईक म्हणाले, समर्थ रामदास स्वामींची सेवा करण्याची संधी या मंडळाने दिली हे माझे भाग्य आहे. किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिराच्या नूतनीकरणाचे तसेच सिंहासनाचे उदघाटन नुकतेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मठाच्या कामाचे आज भूमिपूजन झाल्यानंतर हे कामही लवकरात लवकर कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या कामासह किनारपट्टी भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍यांची कामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रलंबित आहेत ही कामेही लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मच्छीमार बांधवांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा राहिला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यास मी नेहमीच प्राधान्य दिले आहे त्यामुळे या पुढील काळातही मच्छीमारांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

         यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच नाना नाईक, दिलीप घारे, दीपा शिंदे, प्रियांका रेवंडकर, मनोज लुडबे, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, प्रदीप वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.