कष्टकरी, शेतकऱ्यांना सुखी आणि संपन्न कर

आई भराडी देवी चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे
Edited by:
Published on: March 02, 2024 10:25 AM
views 348  views

सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणांहून भाविक येतात. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होऊ दे, त्यांच्या जीवनात समृध्दी येऊ दे, त्यांना सुखी आणि संपन्‍न कर असे साकडे आई भराडी देवी चरणी घातले.

आंगणेवाडी येथील यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री भराडी देवी यात्रोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, आंगणे कुटुंबीयांचा मंदिर विकासामध्ये असणारा सहभाग कौतुकास्पद असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आई भराडी देवीच्या आर्शिवादाने मला मुख्यमंत्री पद सांभाळण्याची आणि जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. दीड वर्षामध्ये शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. सिंचनाचे प्रकल्प वाढवून कोकणातील अनुशेष भरुन काढण्यासंदर्भात अधिवेशनात नुकतीच चर्चा झाली. कोकणात शक्य तितके बंधारे, लघु व मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करुन वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे. आरोग्य, दळण वळण अशा अनेक क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुंबई-सिंधुदुर्ग हा ग्रीन फिल्ड रस्ता बनविण्यात येणार आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे. कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील शेतकरी आणि नागरिकांना अनेक सुविधा पुरविण्यात येणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.