
सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून शांत, संयमी व सुसंस्कृत जिल्हा म्हणून परिचित आहे. मात्र, या लौकिकास बाधा येणाऱ्या घटना जिल्ह्यात वाढत असून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशावेळी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून जिल्ह्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा व अशा प्रवृत्तींवर योग्य ती कारवाई करावी असे आवाहन जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत 'आम्ही भारतीय' या व्यासपीठाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना 'आम्ही भारतीय' व्यासपीठाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात सध्या घडत असणाऱ्या विविध घटनाबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यानुसार सजग नागरिक म्हणून अलीकडेच घडत असणाऱ्या विविध संवेदनशील व गंभीर विषयाकडे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यासंदर्भातील अनेक घटनांचा तपशील निवेदनात दिला आहे. जिल्ह्यात धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल, अशा स्वरूपाच्या घटना कशाप्रकारे घडत आहेत, याचा तपशील दिला आहे. धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल अशा स्वरुपाच्या घटना वारंवार घडत असून अशा व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करावी. मात्र, निरपराध्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व सर्वसामान्य त्यात भरडला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवेदनात केले आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची व संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतलेली असताना अल्पसंख्यांक समुदायाबाबत आक्षेपार्ह व संविधानाच्या तरतुदीविरोधात विधाने प्रसिद्ध होत असल्याने जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनले आहे. अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावनाही निर्माण होत आहे. राष्ट्रीय पुरुषांची अवहेलना काही व्यक्तींकडून होत असल्याने जातीय तेढही निर्माण होत असून अशा व्यक्तीवर योग्य ती कारवाही व्हावी. शिवाय विद्वेषी भाषणे करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करून धार्मिक सलोखा कायम ठेवावा असे आवाहनही या निवेदनात केले आहे.
जिल्ह्यातील शांतताप्रेमी नागरिकांच्या शांतता समिती, मोहल्ला समिती तयार करून कायदा सुव्यवस्था कायम राखावी. जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर अथवा अन्य विक्रेते यांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात देश विदेशातील पर्यटक येत असतात. त्यामुळे या पर्यटकांना पोषक वातावरण आवश्यक असल्याने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व पर्यटन व अन्य उद्योगावर विपरीत परिणाम होणार नाही. जिल्ह्यातील धार्मिक जातीय तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे.जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेऊन लवकरच शांतता समितीची पुनर्रचना करु, असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. यावेळी ॲड. देवदत्त परुळेकर कमलताई परुळेकर, ॲड. संदीप निंबाळकर, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, सतीश लळीत, महेश परुळकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक पाटील, मोहन जाधव, नंदकुमार पाटील, रमेश बोंद्रे, पी एल कदम, विद्याधर कुडाळकर,भूषण कुडाळकर, रमेश सावंत, सहदेव पाटकर, डॉ. मंगेश सावंत, बाळू मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.