
सिंधुदुर्ग : कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले. यावेळी पत्रकार महेश सरनाईक यांचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार तर फोंडा, कणकवली येथील सुरेश सामंत यांचा जीवनगाैरव पुरस्काराने बेळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक संजय कुळकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबईचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन शारदाश्रम विद्यामंदिर दत्तमंदिर सभागृह, भवानी शंकर मार्ग, दादर पश्चिम मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे झाले.
यावेळी कार्याध्यक्ष वीणा दाभोलकर, अध्यक्ष जगदीश वालावलकर, उपाध्यक्ष मधुकर सामंत, विश्वस्त नरसिंह पंतवालावलकर, खजिनदार योगेश खानोलकर, कार्यवाह महेश राळकर, कार्यवाह यशवंत बागलकर आदी उपस्थित होते. सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत शारदाश्रम विद्यामंदिरच्या सभागृहात वधू-वर व पालक मेळावा झाला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक मनीष दाभोलकर, सूत्रसंचालन पाैर्णिमा खानोलकर, तर आभार रत्नाकर तेंडोलकर यांनी मानले. स्व. बा.नी. देसाई आदर्श समाजसेवा पुरस्कार मुंबई सांताक्रूझ येथील शांताराम केळूसकर, स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पालघर येथील विजय वालावलकर, सूर्याजी रामकृष्ण (काका कोचरेकर) आदर्श समाजसेवक पुरस्कार कुडाळ येथील शैलजा शेखर सामंत यांना देण्यात आला, तर मेंगलोर येथील शिवानंद प्रभू, राष्ट्रीय खेळाडू निधी तुषार सामंत, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदानाबाबत निनाद खानोलकर यांचाही गाैरव करण्यात आला.
यानिमित्ताने डोंबिवली कट्टाच्या कलाकांराची मैफल सजली होती. यात मानसी नाईक हिने ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘वेदा नाही, नाही कळला, अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा’ अशी एकापेक्षा समुधुर गीते सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मानसीसोबतच प्रथमेश प्रभू यांनीही काही गाणे सादर केली. अनघा देसाई आणि प्रणाली राळकर या जोडीने नृत्य सादर केले. तर डोंबिवली सहयोग कट्टाच्या अदिती तेंडोलकर, मेघा तेंडोलकर, मीना पाटील, साक्षी नाईक, ईश्वरी ठाकूर, प्रांजली राळकर या महिला कलाकारांनी फ्यूजन डान्स प्रकार सादर करून वाहवा मिळविली.