
वैभववाडी : मांगवली येथील महेश रामदास संसारे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल कोकणस्थ वैश्य समाज, मुंबई संस्थेच्या वतीने मातृसंस्था सन्मान पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. पाचल(ता. राजापूर) येथे रविवारी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गव्यसिद्ध महेश संसारे हे प्रगतशील शेतकरी असून गेल्या २५ वर्षांपासून शेतीपूरक व्यवसायात आहेत. राजकीय सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करतानाच त्यांनी 'पंचगव्य थेरेपी'मध्ये 'मास्टर डिप्लोमा' पूर्ण करुन अनेक व्याधी, आजारांवर ते उपचारही करतात. तसेच देशी गायीचे दूध, मूत्र, शेणापासून विविध उत्पादने स्वतः बनवून मागणीनुसार विक्री करतात. तसेच देशी गोपालन, सेंद्रिय शेतीवर व्याख्याने देतात.
संसारे यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या कृषी विभागाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्याबद्दल कोकणस्थ वैश्य समाज संस्थेच्यावतीने महेश संसारे यांना मातृसंस्था सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपत(भाई) शेटये, चिटणीस जागृती गांगण आदी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.