ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे महावितरणचं काम : किशोर खोबरे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 07, 2023 15:52 PM
views 305  views

कुडाळ : ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे महावितरण कंपनीचे महत्वाचे काम आहे.  जर यात कसूरता होत असेल तर ते चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी समन्वय साधणे ही त्यांची जबाबदारी आहे. दिवाळीनंतर ग्राहक मेळावे घेतले जातील, तर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे संभाषण कौशल्य प्रशिक्षण घेतले जाईल अशी माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महावितरण जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.

कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित बैठकीत महावितरण जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे बोलत होते यावेळी, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका आफ्रिन करोल, नगरसेवक विलास कुडाळकर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड,माजी सरपंच रोणापाल सुरेश गावडे, नितेश शिरसाट, गोविंद सावंत, द्वारकानाथ घुर्ये, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खोबरे म्हणाले ग्राहक हा महावितरणचा पाया आहे. जर ग्राहकांशीच महावितरणचे अधिकारी उद्धट वागत असतील तर ते चुकीचे असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांना संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगितले. तर यावेळी उपस्थित सर्व महावितरणच्या ग्राहकांनी अधिकाऱ्यांच्या फोन न उचलण्याच्या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तर जिल्ह्यात अनेक जीर्ण विद्युतखांब अद्यापही तसेच आहेत. ते तत्काळ बदला, 33 केवी लाईनची पाहणी करा. पंचवीस वर्षे जुने झालेले लाईन बदला, तर उद्धट वर्तवणूक असणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अशी मागणी केली.

तर या बैठकीत महावितरण जनसंपर्क अधिकारी श्री खोबरे यांनी सांगितले की, वीज ग्राहक म्हणून  मांडलेल्या सर्व सूचना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्या जातील व याबाबत तातडीने दीपावली नंतर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करू असे आश्वासन महावितरण जन जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे  यांनी दिले.