
कोकणी माणूस सहसा संयम सोडत नाही ; लोकांचे हाल करू नका : आ.केसरकर
सावंतवाडी : मान्सूनपूर्व कामे झाली नाहीत ही वस्तूस्थिती आहे. मे महिन्यात काम पूर्ण न झाल्याने विजेची समस्या असल्याची प्रांजळ कबुली दोडामार्ग उप कार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी यांनी दिली. मतदारसंघातील वीज समस्यांबाबत झालेल्या बैठकीत आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील अभियंतांना तक्रारींबाबत विचारणा केली. कोकणातील लोक कधीही संयम सोडत नाही. त्यामुळे परिस्थिती बदला, त्यासाठी लागेल ते करा. पैसा, सामुग्री कमी पडल्यास मला सांगा. पण, लोकांचे हाल करू नकात असे निर्देश आम. केसरकर यांनी दिले.
सावंतवाडी नगरपरिषद सभागृहात सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांबाबत बैठकीच आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. केसरकर यांनी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करत सुचना केल्या. याप्रसंगी यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदींसह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मान्सूनपूर्व काम न झाल्याची कबुली !
या बैठकीत दोडामार्ग उप कार्यकारी अभियंता श्री. हंत्तरगी यांनी मे महिन्यात मान्सून पूर्व काम झाली नाहीत ही वस्तूस्थिती आहे. तुमच्याशी खोटं बोलणार नाही अशी कबुली दिली. मात्र, ही काम आता अंतिम टप्प्यात आहेत. कंत्राटदारांच्या टीम कार्यरत आहेत. वाहन, ट्री कटर व इतर सामुग्रीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समस्या तात्काळ सोडवण्याचे श्री. केसरकर म्हणाले.
सावंतवाडीतील समस्यांचा पाढा !
सावंतवाडी शहरात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत श्री. केसरकर यांनी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना विचारणा केली. शहरी भागात सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याची कारणे काय ? असा सवाल त्यांनी केला. तसेच अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. अंडरग्राऊंड योजना झाल्यावर या गोष्टी थांबतील असे केसरकर म्हणाले. तर, शहरात पुन्हा सतत लाईट जाणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश दिले. तालुक्यात आंबोली, चौकुळ आदी दुर्गम भागात टीम कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना केल्या. यावेळी शहर अभियंतांनी झाड पडल्याने मोठ्या समस्या उद्धवत असल्याचे सांगितले. इतर समस्या सोमवारी दूर केल्या जातील अशी माहिती दिली.
वेंगुर्लेप्रश्नी श्री.वालावलकर आक्रमक
यावेळी वेंगुर्ला येथील अंडरग्राऊंडसाठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला. अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यानं श्री. वालावलकर आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का पूर्ण होत नाहीत? कोट्यावधी रूपये आम. केसरकर यांनी दिलेले असताना काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आमच्या सारख्यांची महावितरण वीज अधिकारी दिशाभूल करत आहे. अधिकाऱ्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही अस ते म्हणाले. यावेळी आम. केसरकर यांनी मध्यस्थी करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानक येथील ट्रान्सफॉर्मर का बदलला गेला नाही ? असा सवाल केसरकर यांनी केला.
लोकांचे हाल करू नका : दीपक केसरकर
दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला येथील समस्यांबाबत श्री. केसरकर यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. चांगले ट्री कटर, वाहन देण्याचे काम करतो. तोवर भाडेतत्त्वावर गाड्या पुरवित आहे. तिनं डिव्हीजनला तिन वाहन तात्काळ देण्यात येतील. वीज समस्या सोडविण्यासाठी गावात कार्यरत असणाऱ्या टीमसाठी निवास व्यवस्था करण्याच्या सुचना केल्या. तसेच कोकणातील माणूस कधीही संयम सोडत नाही. त्यामुळे लोकांचे हाल करू नका असे आवाहन केले. लोकांचे फोन उचलले गेले पाहिजे. सप्लाय बंद झाल्यावर त्याची कल्पना देत चला असेही सांगितले. यावेळी तिन्ही तालुक्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नेते अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सत्यवान बांदेकर, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.