
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्याला वीज पुरवठा करणारी निवळी वाहिनी मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जात पिन इन्सुलेटर व इतर दुरुस्ती करत या वीज वाहिनीची दुरुस्त केली. यामुळे संगमेश्वर तालुक्याला वीज पुरवठा करणारी पर्यायी वाहिनी दुरुस्त झाल्याने ग्राहकांना सणासुदीच्या काळात गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
महावितरणच्या संगमेश्वर उपकेंद्राला निवळी व आरवली अशा दोन उपकेंद्रातून ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. सदर वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरुख, साडवली व साखरपा अशी इतर तीन उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांवरून सुमारे ६० हजार वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री निवळी व आरवली या दोन्ही लाईनवर बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे चारही उपकेंद्र व उपकेंद्रातील सर्व वीज ग्राहक अंधारात गेले. अथक प्रयत्नानंतर १८ ऑगस्ट रोजी आरवली उपकेंद्रातून येणारी वाहिनी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
त्यानंतर निवळी वीज वाहिनी वरील बिघाड शोधण्यात आला. सदरचा बिघाड वांद्री मानसकोंड येथील एका पोलवर आढळला. सोनवी नदीच्या पूर पात्रात हा पोल असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे जिकीरीचे व आव्हानात्मक होते. परंतु आरवली वाहिनी सणासुदीला पुन्हा बंद पडली तर पुन्हा तालुका अंधारात जाणार असल्याने व बोट उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याने महावितरणच्या जनमित्रांनी स्वतःच खोल पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. नदीचे खोल पात्र, सततचा पाऊस, नदी प्रवाहाचा प्रचंड वेग यामुळे हे काम प्रचंड धोकादायक होते. परंतु जनमित्र आणि अभियंत्यांनी हा धोका पत्करला. रस्सीच्या साहाय्याने खोल पात्रात उतरून पुन्हा पोलवर चढून भर पावसात पिन इन्सुलेटर बदलला व संपूर्ण वाहिनीचा पुन्हा पेट्रोलिंग करून पूर्ण निवळी वाहिनी सुरू केली. यामुळे तालुक्यासाठी असणारी पर्यायी वाहिनी अखंडित विजपुरवठ्या साठी पूर्ववत केली.
महावितरणचे जिगरबाज जनमित्र विलीन काष्टे, प्रतीक तांबे, किरण मोरे, रुपेश फेपडे,सचिन कुंभार यांनी लाईन फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहिम पूर्ण केली. याकरता कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे, सहाय्यक अभियंता फारूक गवंडी व उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांचे मार्गदर्शन लाभले. या कामाकरता वीज ग्राहकांकडून तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने व कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनीही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.