महाराष्ट्रातील पहिले आंतरजातीय - आंतरधर्मीय वधू - वर सूचक केंद्र

'अंनिस' चे महत्वाचे पाऊल!
Edited by: मनोज पवार
Published on: July 22, 2025 18:29 PM
views 54  views

रत्नागिरी : सध्या राज्यात आणि देशभरात जाती जाती आणि धर्मा धर्माच्या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या लोकांच्यासाठी असे जोडीदार शोधणे अत्यंत अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू वर सूचक केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करणाऱ्या वधू वरांनी आणि पालकांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे. 


डॉ.नरेंद्र दाभोलकर हे 'जात ही एक मोठी अंधश्रद्धा आहे' असे म्हणत असत.‌ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही 'आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाले तर जाती निर्मूलन लवकर होईल' असे  मानत. त्यानुसार गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावते. आजअखेर असे शेकडो विवाह अंनिस मार्फत राज्यभर लावण्यात आले आहेत. अशा विवाह करणाऱ्या मुला मुलींना महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र, रहिमतपूर (सेफ हाऊस) सातारा येथे चालू केले आहे. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ही विविध योजना राबवते.


अंनिसच्या या केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी 

जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना याची पडताळणी केली जाते.  सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह करावा असा सल्ला दिला जातो. नाव नोंदणीची सेवा ही विनामूल्य दिली जाते. 


आज समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधू वर सूचक केंद्र आहेत, परंतु जात धर्म न मानणाऱ्या पालकांना किंवा वधू-वरांना जर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करायचा असेल तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सोय महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे.


आंतरजातीय,आंतरधर्मीय तसेच विधवा- विधुर विवाह करू इच्छिणाऱ्यांनी आपली माहिती या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे ( मु. पो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा संपर्क 99223 55435)

आणि डॉ.ज्ञानदेव सरवदे, बारामती (संपर्क 9527721475) यांना पाठवावी किंवा आपल्या गावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख,मिलिंद देशमुख, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर, डॉ.अशोक कदम, राजीव देशपांडे, प्रकाश घादगिणे, मुंजाजी कांबळे, विनोद वायंगणकर, फारुख गवंडी, अण्णा कडलासकर यांनी केले आहे.