
सावंतवाडी : राज्यातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. विशेषतः बाजार समित्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या सेसच्या होणाऱ्या अन्यायी व दुहेरी वसुलीचा याचा शासनाने फेरविचार करणे आवश्यक आहे तसेच शासन अन्नधान्यावर पुन्हा अन्यायकारक जीएसटी लावण्याच्या विचारात आहे. हा शासनाचा प्रयत्न व्यापारी संघटना व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व अॅग्रीकल्चरने २७ आॅगस्ट रोजी प्रस्तावित बंद पूर्ण ताकदीने यशस्वी करण्याचे ठरविले आहे.
मसिआ महाराष्ट्रच्या मिडिया चे कोचेअरमन अॅड नकुल पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबाबत व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या रास्त मागण्याबाबतं मसिआचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यापूर्वीच शासनाला निवेदन देवून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची जीएसटीच्या जाचक अटितून मुक्तता करावी मात्र शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने महाराष्ट्र राज्य व्यापार कृती समितीने दिनांक २७ आॅगस्ट रोजी व्यापार बंद जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी हा बंद यशस्वी करून शासनाला जाग आणावी असे आवाहन मसिआचे कोकण विभागीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, गव्हर्निंग कौन्सिलचे जिल्ह्यातील सदस्य राजन नाईक, संतोष राणे, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, अच्युत सावंतभोसले, शिवाजी घोगळे व मिलींद प्रभू यांनी केले आहे.