महाराष्ट्र प्राथ. शिक्षक समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जावेद तांबोळी

Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2025 15:20 PM
views 142  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदावर चौकुळ येथील उपक्रमशील शिक्षक जावेद तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे.

आंबोली येथे झालेल्या कार्यक्रमात समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक नारायण नाईक तसेच जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव यांच्या हस्ते तांबोळी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही राज्यातील सर्वात जुनी, विश्वासार्ह व प्रभावी अशी शिक्षक संघटना मानली जाते. शिक्षकांच्या हक्कांचे रक्षण, शैक्षणिक गुणवत्तावाढ, विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन तसेच समाजाशी शिक्षकांना जोडणारे कार्य या संघटनेतर्फे केले जाते. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदाचा उद्देश समितीचे कार्य, उपक्रम आणि धोरणे समाजापर्यंत तसेच शिक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा असून, संवादकौशल्य, लेखनकौशल्य आणि संघटनात्मक दृष्टीकोन या पदासाठी आवश्यक ठरतो.

तांबोळी हे सुरुवातीपासूनच शिक्षकांच्या प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीच्या वेळी माजी जिल्हाध्यक्ष नाईक यांनी “तांबोळी या पदाला निश्चितच न्याय देतील” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,जावेद तांबोळी हे नवोन्मेषी विचारांचे आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षक आहेत. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात शिक्षक समितीचे विचार प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचले आहेत. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावरून ते समितीची भूमिका अधिक ठळकपणे मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे.”याप्रसंगी आपली भावना व्यक्त करताना जावेद तांबोळी म्हणाले,

“माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीचा मी सन्मान करतो. शिक्षक समितीचे कार्य आणि उपक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी माझ्या लेखणीचा, संवादकौशल्याचा आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून सातत्याने प्रयत्न करेन. शिक्षक बांधवांच्या हितासाठी आणि समितीच्या बळकटीसाठी माझ्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.”

दरम्यान, पालघर येथून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सचिन कोकितकर यांचे स्वागत या कार्यक्रमात करण्यात आले. तसेच सुरज साठे, अविनाश शिरगिरे, सागर पाटील, सत्यजित वेतूर्लेकर, अवधूत जाधव, सुनील देशमुख यांसह उपस्थित शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गावडे यांनी केले. आभार गजानन सोमवंशी मानले. या निवडीच्या कार्यक्रमास आंबोली, चौकूळ येथील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.