
सावंतवाडी : वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी 'महाराष्ट्र लोकाधिकार समिती' आक्रमक झाली आहे. या गंभीर प्रश्नावर वनखात्याला जाग आणण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी बस स्थानकासमोर सह्यांची मोहीम सुरू करून या प्रश्नावर जनप्रबोधन केले जाईल. या मोहिमेच्या शुभारंभाला समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांनी दिली.
गवे-रेडे, हत्ती, माकडे आणि रानडुक्कर यांसारख्या वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून पिके फुलवतात, मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेकदा संपूर्ण पिके नष्ट होतात. हत्ती आणि गवे-रेडे पिके तुडवतात, तर माकडांची टोळकी फळे आणि भाज्यांचा नाश करतात. अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची घरेदारेही सुरक्षित राहिलेली नाहीत. जुन्नरसारख्या भागात बिबटे नरभक्षक बनल्याने शेतकऱ्यांच्या जीविताची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी, शेतकऱ्याला वाचवणे आणि त्याला जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या संकटावर तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने केली आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यातील किचकट तरतुदी शिथिल करणे, नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने सुलभ करणे, तसेच सोलर फेंसिंग, जाळी यांसारख्या संरक्षणात्मक साधनांसाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपक कुडाळकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या संकटावर मात करण्यासाठी आणि अन्नदात्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहून, शाश्वत उपायांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.










