
सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. यांनी केलेले सगळे प्रकल्प फसले आहेत. मोठमोठी टेंडर काढून एव्हेंट करण यांचं काम असून हे सरकार एव्हेंटजीवी आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात ते बोलत होते.
आ.जयंत पाटील म्हणाले, मालवणला झालेली घटना दुर्दैवी आहे. काही महिन्यांपूर्वी उभा केलेला हा पुतळा कोसळला. वादळ, वार नसताना हा पुतळा कोसळला. मोठं वादळ असतं तर झाडांचीही पडझड झाली असती. मात्र, तसं न होता केवळ पुतळा पडला. याचा अर्थ पुतळा सदोष होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करण्याचं काम सरकारने केले. आपटेंची कुवत नसाताना काम देणारा खरा दोषी आहे. दोन फुटांच्यावर त्यांनी कधी पुतळे केले नाहीत. त्यांना काम देणारा दोषी आहे. सरकारचे आपटेंना वाचावायचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवताना कामाचा दर्जा उत्तम आहे का ? हे बघण्याच तारतम्य महाराष्ट्र सरकारने बाळगायला हवं होतं. त्यामुळे आता नौदलावर न ढकलता महाराष्ट्राची व शिवप्रेमींची क्षमा राज्य सरकारने मागावी असं मत त्यांनी व्यक्त केल.
दरम्यान, आपटे शिल्पकाराचा पत्ता नौदलाला कसा समजला ? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुढाकारातून हे सगळं झालेलं आहे. आपटे हा कल्याणचा निघाला. काम बांधकाम खात्यानेच करून घेतलं. पुतळा बसविण्याच काम नौदलाने केलं. दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे. पुतळा पडल्यावर गप्प बसून भाजपची आरती करावी का ? महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा पुतळा उभा करताना सरकार काळजी घेत नाही. टेंडर न काढता वर्क ऑर्डर देतात. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. केवळ गुन्हे दोघांवर दाखल करून चालणार नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुतळा पडल्यावर आम्ही बोललो तरी राजकारण करतो असं भाजप म्हणत आहे. चबुतऱ्याचा फरशांवर बोललो असतो तर मोठा आवाज केला असता असा टोला हाणला. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक अध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.