आरोसमध्ये उद्या महाराजस्व शिबीर

महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचं होणार वाटप
Edited by: भगवान शेलटे
Published on: August 03, 2025 21:35 PM
views 89  views

बांदा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मडूरे महसूल मंडळ मधील आरोस येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबीराचे आयोजन आरोस गिरोबा विद्यालय इथं करण्यात आले आहे.

या शिबिरात मडूरे मंडळ मधील आरोस, दांडेली, सातर्डे, साटेली, सातोसे, कवठणी, न्हावेली, पाडलोस, मडूरे या गावातील ग्रामस्थांना महसूल विभागाकडील विविध दाखले वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

त्यासोबतच महसूल विभागाशी संबधित अर्जाशी निगडीत कागदपत्रांची माहिती देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात

१) पुरवठा पत्रिका वाटप

२) संजय गांधी निराधार योजना मंजुर प्रकरणांचे वाटप

३) उत्‍पन्‍न दाखल्‍याचे वाटप

४) जातीच्‍या दाखल्‍यांचे वाटप

५) लक्ष्‍मी योजना लाभार्थ्याना ७/१२ वितरण

६) शेतकरी दाखले वितरण

७) अभिलेखातील दुरुस्‍तीसाठी कलम १५५ खालील दुरुस्‍तीचे आदेश व ७/१२ वितरण

८) राजपत्रानुसार ७/१२ अभिलेखात नावात बदल

९) ई पिकपहाणी १०) अॅग्रीस्‍टेक अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत होणार आहेत.

या  शिबिरास वरील गावातील सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा कॉलेज यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मडूरे मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर,  तसेच वरील सर्व गावातील ग्राम महसूल अधिकारी आणि सरपंच यांनी केलं आहे.