
; १५ महसूल सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार
कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयामार्फत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)' अंतर्गत प्रत्येक मंडल स्तरावर महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.
एकाच दिवशी मिळणार १५ सेवांचा लाभ
या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या गावातच त्वरित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरामध्ये प्रामुख्याने खालील सेवा उपलब्ध असतील:
प्रलंबित फेरफार आणि ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती.
डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप.
उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे.
अकृषिक (NA) परवानगी आणि 'सनद' प्रक्रियेची माहिती.
सामाजिक अर्थसाहाय्य योजना (संजय गांधी योजना) आणि विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले.
पीएम किसान नोंदणी, ई-मोजणी अर्ज आणि घरांसाठी पट्टे वाटप.
मंडल निहाय शिबिरांचे वेळापत्रक (सकाळी १० वाजल्यापासून)
अ.क्र. मंडळाचे नाव दिनांक
१ वालावल ०७/०३/२०२६
२ कसाल १४/०३/२०२६
३ गोठोस २५/०३/२०२६
४ ओरोस बुद्रुक १०/०४/२०२६
५ कडावल १७/०४/२०२६
६ पिंगुळी २४/०४/२०२६
७ झारप ३०/०४/२०२६
८ कुडाळ ०८/०५/२०२६
९ माणगांव १५/०५/२०२६
१० भडगांव २०/०५/२०२६
'राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने'साठी विशेष आवाहन
या अभियानांतर्गत 'राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने'चाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुख्य कमावती व्यक्ती (वय १८ ते ५९ वर्षे) मरण पावल्यास, त्या कुटुंबाला २०,००० रुपये एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज आणि मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला.
वयाचा पुरावा (आधारकार्ड/शाळा सोडल्याचा दाखला).
कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला.
बँक पासबुक आणि आधारकार्डची छायांकित प्रत.
पात्र कुटुंबांनी मयत व्यक्तीच्या मृत्यूच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या आत आपला प्रस्ताव संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी शाखेकडे सादर करावा.
"कुडाळ तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित दिवशी उपस्थित राहावे."
— सचिन पाटील, तहसीलदार कुडाळ











