चौकुळ नं. 4 म्हाराठी शाळेत महा स्वच्छता अभियान

Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2025 15:23 PM
views 104  views

सावंतवाडी : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाभर स्वच्छता ही सेवा अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत “महा स्वच्छता अभियान” घेण्यात आले.


या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 म्हाराठी शाळा उत्साहाने सहभागी झाली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शाळेच्या आवारात, वर्गखोल्यांमध्ये, खेळाच्या मैदानात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी “स्वच्छता हीच सेवा” या घोषणांनी केली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गांधीजींचे विचार, तसेच स्वच्छतेचे आरोग्यावर होणारे परिणाम समजावून सांगितले. पालकांनीही शाळेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत विद्यार्थ्यांसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला.

या उपक्रमात प्लास्टिकमुक्त परिसर, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत, तसेच पाण्याची बचत याबाबत माहिती देण्यात आली. लहानग्या विद्यार्थ्यांनी झाडू हातात घेऊन शाळेचे प्रांगण स्वच्छ केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना “प्रत्येक दिवस थोडी स्वच्छता – आजीवन आरोग्यसंपदा” हा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थितांचे आभार मानले व सर्वांना दररोजच्या जीवनात स्वच्छतेची सवय लावण्याचे आवाहन केले.

 अशा उपक्रमांमुळे शाळेत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.