तब्बल दोन तपानंतर माडखोलच्या पावणाई मंदिरात घुमणार हरिनामाचा गजर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 11, 2024 13:40 PM
views 337  views

सावंतवाडी : सुमारे २४ वर्षे स्थगित असलेला माडखोल गावचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीपासून सुरू होत आहे. सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाला बुधवारी विधिवत प्रारंभ झाला. गुरुवारी १२ डिसेंबरला या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यामुळे तब्बल दोन तपानंतर माडखोल गावचे ग्रामदैवत पावणाई मंदिरात हरिनामाचा गजर घुमणार असून गावात उत्साहाचे वातावरण आहे.

यानिमित्त मंदिरात बुधवारी सकाळी हरिनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ झाला. त्यांनतर भजनाचा अखंड गजर सुरूच राहणार आहे. यात माडखोल गावातील सर्व भजनी मंडळे आपली सेवा श्री चरणी अर्पण करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी तरंगकाठीसह सवाद्य पालखी तीर्थक्षेत्राकडे जाऊन आल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी, सेवेकरी आणि माडखोल ग्रामस्थांनी केले आहे.