लंपीने देवगडमध्ये दगावले जनावर..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 10, 2023 14:18 PM
views 327  views

देवगड :  देवगड तालुक्यात लंपी रोगाने थैमान घातले असून,अतापर्यंन्त ५५ गुरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. यामध्ये मुणगे गावातील एका बैलाचा मृत्यु झाला आहे. देवगड तालुक्यात गेल्या आठ दिवसात लंपी रोगाने अक्षरश: थेमान घातले असून लुळी पडून गुरे जाग्यावर पडून असल्याने शेतकरीवर्गात सध्या भीतीचे वातावरण आहे.तालुक्यात ५५ गुरांना लम्पी रोगाची लागण झाली.यामध्ये खुडी ६, मुणगे ९, पोयरे ५, दहिबांव २, कुणकेश्वर ६, इळये ५, दाभोळे ८, टेंबवली कालवी ४, मोंड ४ आणि बापर्डे ४ एवढ्या गुरांना या रोगाची लागण झाली आहे.यामध्ये लागण झालेल्या मुणगे येथील एका बैलाचा मृत्यु झाला आहे अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी दिली.

लागण झालेल्या सर्व गुरांवर उपचार सुरू असून यामधील बहुतांशी गुरांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.लागण झाल्यानंतर तात्काळ पशुवैद्यकीय विभागामार्फत गुरांवर उपचार सुरू करून लसीकरण करण्यात आले आहेत.स्थानिक दवाखान्यात पुरेसा लससाठा, औषधसाठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी गुरांना या रोगाची लागण झाल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन डॉ.घोगरे यांनी केले आहे.