महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

Edited by:
Published on: January 10, 2025 19:54 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन  वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांना लकी ड्रा व्दारे  स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे  दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रामध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in  भेट द्यावी.