मंत्री केसरकरांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी ; 50 खोक्यांचा देखावा उभारत ठाकरे गटाच आंदोलन

Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 15:55 PM
views 68  views

सावंतवाडी : शून्य शिक्षकी शाळेत येत्या दोन दिवसात शिक्षक सेवक न दिल्यास शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा निघेल असा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे दिला. तर शिवसैनिकांची गद्दारी करून दीपक केसरकर शिंदे गटात गेले त्या केसरकारांनी कुठल्याही पक्षातून पुन्हा निवडणूक लढवावी येथील जनता त्यांचा निश्चितच पराभव करेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. ठाकरे सेनेकडून गांधी चौकात दीपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला.


सावंतवाडी स्थानिक आमदार दीपक केसरकर हे आजच्या दिवशी शिंदे गटात सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर आज केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत येथील गांधी चौकात आंदोलन करत निदर्शन करण्यात आले. यावेळी 50 खोक्यांचा देखावाही उभारण्यात आला होता. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह बाळा गावडे  ,मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, सुनील गावडे, श्रुतिका दळवी, भारती कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना श्री पडते म्हणाले, ज्या शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण केसरकर यांना निवडून दिले होते मात्र केसरकर मतदारांचा व शिवसैनिकांचा कोणत्याही विचार न करता गद्दारी करून शिंदे गटात सामील झाले होते म्हणून आजचा दिवस आम्हा शिवसैनिकांसाठी गद्दार दिवस आहे. किसरकरांनी शिंदे गटात जाताना या भागाचा विकास व्हावा म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते परंतु आज वर्ष झाले तरी या भागाचा विकास झाला का हा केवळ घोषणाबाजी करणे आणि जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणे हेच काम केसरकर करत आले आहे. त्यामुळे त्यांनी येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षातून निवडणुकीत उतरावे येथील शिवसैनिक त्यांचा पराभव निश्चितच करेल हे काळ्या दगडावरची रेघ आहे.

ते पुढे म्हणाले, आज शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना शिक्षण खात्याला कायमा फासण्याचे काम केसरकर यांनी केले आहे जिल्ह्यातील तब्बल 121 शाळा शून्य शिक्षकी होण्यासही केसरकरच जबाबदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे येथे दोन दिवसात जर या शून्य शिक्षकी शाळेमध्ये शिक्षक सेवक न दिल्यास शिवसेनेचा मोर्चा जिल्हा परिषदेवर निघेल याची दखल त्यांनी घ्यावी. आज बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून शिक्षक सेवक देऊन मुलांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे मात्र शिक्षण मंत्री चिडीचूप आहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल. यावेळी 50 खोके एकदम ओके जनता तुपाशी आमदार उपाशी या सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत मंत्री केसरकर यांचा निषेध केला.