पर्यटनाचा महामेरू हरपला ! - डी. के. सावंत यांच्या स्मृतींना उजाळा !

अनेकांनी वाहीली भावपूर्ण आदरांजली
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 08, 2023 20:01 PM
views 343  views

सावंतवाडी : बुधवारी सावंतवाडी मळगाव रस्त्यावर असलेल्या डी. के. रेसिडेन्सी येथे पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व डी के सावंत उर्फ ध्रुव बाळ सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, ज्येष्ठ वकील ॲड.बापू गव्हाणकर, मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, ॲड. नकुल पार्सेकर, माजी सभापती प्रमोद सावंत, पर्यटन विकास महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, भाई देऊलकर, अशोक देसाई, कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, अभिलाष देसाई, सेवानिवृत्त प्राचार्य अन्वर खान, बाळ बोर्डेकर, दीनानाथ सावंत, रेश्मा सावंत, नंदू तारी, आबा कोटकर, विनोद सावंत, शामकांत काणेकर, रामदास पारकर, शिवप्रसाद देसाई, गुंडू साटेलकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, प्रा. रूपेश पाटील, दिलीप वाडकर, माजी उपसभापती शितल राऊळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुधीर धुमे, डी. के. सावंत यांच्या पत्नी शिवांगी सावंत, मुलगा शिवप्रसाद सावंत, कन्या शिवप्रिया सावंत, सून सेजल सावंत आदी उपस्थित होते. 

स्व. डी. के सावंत यांना श्रद्धांजली वाहताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले की, डी. के. सावंत म्हणजे पर्यटनाचा प्रचंड अभ्यास आणि विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व होते. आज त्यांच्या जाण्याने आपल्या जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.

सतीश पाटणकर यांनीही डी. के. सावंत यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, डी. के. म्हणजे पर्यटन क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ होते. पर्यटन क्षेत्रात सातत्याने नवनवीन संकल्पना राबविणारे ते खरे पर्यावरण आणि पर्यटन अभ्यासक होते. आज त्यांच्या जाण्याने पर्यटन क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, असेही पाटणकर म्हणाले.

 कॉनबॅकचे मोहन होडावडेकर यांनीही सावंत यांच्या पर्यटन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल गौरवोद्गार काढत स्मृतींना उजाळा दिला.  बाबा मोंडकर म्हणाले, डी. के. म्हणजे आमच्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्ती होते. अत्यंत ध्यास घेतलेली व्यक्ती आज हरपली. पर्यटन विकास संस्थेचे ते सर्वात आदर्श असे मार्गदर्शक होते. 

सेवानिवृत्त प्राचार्य अन्वर खान यांनीही स्वर्गीय सावंत यांच्या बद्दल आदर युक्त भावना अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले की, डी. के सावंत यांनी आपल्या जीवनात कायमस्वरूपी संघर्षाच्या विरोधात लढा दिला. कोकण रेल्वे प्रवासी संघटना व कोकणातील पर्यटन क्षेत्रात त्यांनी मुजोर अधिकारी व प्रशासन यांच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला.

 

यावेळी उपस्थित असलेल्या अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे - परब म्हणाल्या की, डी के सावंत यांच्या रूपाने आपण कोकणातील एक पर्यटन क्षेत्रातील महान रत्न गमावले आहे त्यांची उणीव सदैव जाणवेल मात्र त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सतत काम केल्यास त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल.

यावेळी उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत, प्रा. रूपेश पाटील, शामकांत काणेकर, प्रसन्ना कोदे, सुधीर धुमे यांनी आपल्या मनोगतात स्व. सावंत यांच्या विषयी आदरभावना व्यक्त करीत शब्दसुमनांजली अर्पण केली.

शोकसभेचे सूत्रसंचालन व समारोप ॲड. नकुल पार्सेकर यांनी केला.