लोरे नं. १ ग्रामसभेत वादावादी..!

ग्रामसेवकांना धमकी, ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Edited by:
Published on: August 30, 2023 13:08 PM
views 1351  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ ग्रामसभेत दोन गटात वादावादी झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बसलेले असताना अमित अरुणराव राणे व अन्य ४ जणांनी येत आम्ही दिलेल्या अर्जाची माहिती आताच्या आता द्या,अशी मागणी करत शासकीय काम करत असताना एकत्र जमून केबीन मध्ये बाहेर जाण्यास अटकाव केला. फिर्यादी ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम (वय ४२, रा. कणकवली कनकनगर)यांना तुमचे निलंबन करु अशी धमकी देत शिवीगाळ केली.याप्रकरणी कणकवली पोलिसांनी ५ संशयित आरोपींविरोधात भादवि कलम  186,141,143,147,149,506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ग्रामसेवक  ऋतुराज महादेव कदम (वय ४२,सद्या रा. कणकवली कनकनगर ) हे लोरे नं.१ ग्रामसभेत झालेल्या वादानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना संशयित आरोपी -अमित अरुणराव राणे , चंद्रशेखर दशरथ रावराणे,निलेश अशोक राणे, विशाल विश्राम राणे,मच्छिंद्रनाथ पांडुरंगराव राणे (सर्व राहणार लोरे नं .१ ) यांनी २९ ऑगस्टला १ वाजता ग्रामसेवक केबिन मध्ये आले.

गावचे रहिवासी अमित अरुण रावराणे यांनी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीची माहिती ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मिळावी, याबाबत २५ ऑगस्टला अर्ज केला होता. त्यांचे विनंती प्रमाणे दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास ग्रामसभेमध्ये चर्चा झाली. अमित अरुण रावराणे यांनी मागितलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची असल्याने ती लेखी स्वरूपात नंतर कळविण्यात येईल असे गावचे सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी सांगितले.

परंतु अर्जदारांनी  अर्जातील माहिती आत्ताच पाहिजे, असे  मोठ्या आवाजात सांगत होते. परंतु ग्रामसभेत इतर विषय असल्याने फिर्यादी श्री.कदम यांनी त्यांचे अर्ज विषयी नंतर लेखी माहिती देऊ असे समजावून सांगून पुढचा विषय चर्चेसाठी घेतला. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरील ५ आरोपी यांनी ग्रामसेवक यांचे केबिन मध्ये येत आरोपी नं .१ याने श्री.कदम यांना माझ्या अर्जाची आताच्या आता माहिती द्या, नाहीतर परत ग्रामसभा बोलवा,असे बोलुन तुमची बी.डी.ओ.कडे तक्रार करतो, पत्रकार बोलवतो, तुम्हाला निलंबित करतो, अशी धमकी दिली. आरोपीत नं.१ ते ५ यांनी ऑफिसमध्ये दंगा घातला व आरोपीत नं .१ याने माझ्या अर्जाची माहिती दिली नाही. तर संध्याकाळ पर्यंत इथेच बसायचे तुम्हाला बाहेर सोडणार नाही असे बोलले .आरोपीत १ ते ५ यांनी एकत्र जमून फिर्यादी यांना तुम्ही येथून बाहेर कसे पडता ? ते बघतो असे बोलुन केबिन मधुन बाहेर पडु देत नव्हते. फिर्यादी शासकीय काम करत असताना एकत्र जमून केबीन मध्ये बाहेर जाण्यास अटकाव करुन फिर्यादी यांना धमकी दिली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास श्री. शेगडे करीत आहेत.