डॉन बॉस्कोत साजरा झाला लॉर्ड बेडेन पॉवेल चिंतन दिवस

Edited by:
Published on: February 23, 2024 12:46 PM
views 99  views

सिंधुदुर्गनगरी : डॉन बॉस्को हायस्कूल मध्ये स्काऊट - गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस अर्थात ‘चिंतन दिन’ अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की डॉन बॉस्को प्रशालेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत दि. २१ व २२ फेब्रुवारी अशा दोन दिवसाचे ‘निसर्गनिवास शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता स्काऊट/गाईड ध्वजारोहणाने प्रशालेचे मुख्याध्यापक फा. सावीयो गोम्स यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिरामध्ये इ. ५ वी ते ९ वी च्या एकंदर १४ पथकांनी (१२५ स्काऊट/गाईड) उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.                                                         

सुरुवातीला तंबू उभारण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये केवळ १२ मिनिटांत पथकांनी आपापले तंबू उभारले. त्यानंतर तंबू सजावट करण्यात आली. दुपारी ठीक २ ते ३ या वेळेत हस्तकला, मातीकाम व चित्रकला इ. वर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. नंतर ३ ते ४ या वेळेत नकाशा वाचन व अंदाज यावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. ठीक ४ ते ५.१५ या वेळेत स्काऊट/गाईड यांनी ‘हाईक’ चा अनुभव घेतला. यामध्ये मागाच्या खुणांच्या आधारे संदेश तयार केला. ठिक ५.३० ते ६.३० या वेळेत सर्व स्काऊट/गाईड यांनी साहसी खेळां (नेट क्रावलिंग, मंकी ब्रिज, मंकी क्लाइंबिंग, रिव्हर क्रॉसिंग) चा मनमुराद  आनंद लुटला. सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत ‘बिन भांड्याचा स्वयंपाक’ ही स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर सर्व पथकांनी आपापल्या पथकासाठी स्वयंपाक तयार केला. 

सदर स्पर्धेचे परीक्षण झाल्यावर सन्माननीय श्री. प्रदीप कुडाळकर, शिक्षाधिकारी(प्राथमिक) तथा मुख्य आयुक्त भारत स्काऊट/गाईड यांनी भेट देऊन मेनूचा आस्वाद घेत त्यांचे कौतुक केले. तसेच शेकोटी कार्यक्रमाचेही मान. शिक्षणाधिकारी यांनी उद्घाटन केले.            

दिवेबंद झाल्यावर सर्व पथकांनी क्रमाने रात्रीचा पहाराही दिला. दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत प्रातर्विधी आटोपल्यावर ६.३० ते ७.०० या वेळेत ‘बि. पी. ६ व्यायाम प्रकार’ घेण्यात आले. ठीक ७.०० वाजता ‘सर्व धर्मीय प्रार्थना’ घेण्यात आली. चहापानानंतर ‘तंबू निरीक्षण’ करण्यात आले. यामध्ये स्काऊट/गाईड यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या गाठी व बांधण्याचा समावेश असलेले छोटे मनोरे, झोपाळा, ट्रेसल, प्रवेश द्वार इ. चा समावेश होता.                                                       

ठीक ९.३० वाजता दीप प्रज्वलनाने चिंतन दिवसाची सुरुवात करण्यात आली. रेक्टर फा. पॉल डिसोझा, मुख्याध्यापक फा. सावियो गोम्स, उप मुख्याध्यापक फा. मेल्विन फेराव, रोहिदास राणे(HWB)व मिलिंद लब्दे(HWB) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्काऊट/गाईड ध्वजारोहण झाले. इ. ५ वी ते ९ वी नूतन स्काऊट/गाईड यांचा ‘वचनविधी’ कार्यक्रम घेण्यात आला.                                                                                             

आजच्या घडीला स्काऊट/गाईड चळवळ किती महत्वपूर्ण आहे याचा दाखला देत फा. सावियो गोम्स यांनी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धां मध्ये विजयी झालेल्या पथकांना प्रमाणपत्रे व ‘सर्वसाधारण विजेतेपद’ प्राप्त केलेल्या पथकाला चषक देऊन गौरविण्यात आले. दोन दिवसीय निसर्ग निवास शिबिराचे नेटके आयोजन स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांनी केले होते.