कार्यालयाला टाळे लावून लंच टाईम..!

जिल्हा वाहतूक शाखेचा 'सुशागात' कारभार : जयंत बरेगार
Edited by: विनायक गावस
Published on: March 05, 2024 06:43 AM
views 1284  views

सावंतवाडी : माहिती अधिकार खाली अर्ज दाखल करण्यासाठी १७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास व २७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.३० चे सुमारास गेलो असता, तसेच २१ फेब्रुवारी २०२४ रोजी माहितीचे अवलोकन करण्यास  बोलाविले होते. त्यानुसार दुपारी २.३० चे सुमारास गेले असता प्रत्येक वेळी कार्यालय बंद आढळले. कार्यालयातील अधिकारी पोलीस निरीक्षक यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता "जेवायला गेले असतील असे उत्तर दिले" अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून दिली. 

ते म्हणाले, कोणत्याही खात्याला, कार्यालय ऑफिस बंद करून जेवायला जाणे अपेक्षित नाही. जिल्हाभरातून नागरिक, कामाकरिता आपल्या सोयीच्या वेळेनुसार येत असतात. कार्यालय बंद करून "लंच टाइम "घेतल्याने नागरिकांची खेप फुकट जाते. त्यांचा मौल्यवान वेळ व येण्याजाण्याचा खर्च फुकट जातो. कार्यालयाच्या बाहेर, कामकाजाचे दिवस, सुट्टीचा दिवस, कार्यालयीन वेळ, जेवणाची वेळ , संपर्कासाठी फोन नंबर/मोबाइल नंबर याचा फलक नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी याची दाखल घेऊन याबाबत उचित आदेश वाहतूक शाखेला द्यावेत अशी मागणी जयंत बरेगार यांनी केली आहे.