
मंडणगड : सहकारी चळवळीच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती होत असताना पशुसंवर्धन विभागाची अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व पशु वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक साधनांच्या अभावामुळे दमछाक होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात दुग्ध उत्पादने व दुधाळ जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे तालुक्यातील खासगी पशु वैद्यकीय दवाखाने नाहीत अथवा तशी सोय नाही. त्यामुळे पाळीव पशुधनास आजार झाल्यास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्यात उपलब्ध शासकीय सोईसुविधांवरच अवलंबुन रहावे लागते.
तालुक्यात मंडणगड, लाटवण, शेनाळे, कुंबळे, दहागाव, म्हाप्रळ, पालवणी, देव्हारे, वेळास 9 दवाखाने असून यातील 6 दवाखाने राज्यशासनाचे तर 3 जिल्हा परिषदेचे अखत्यारित आहेत. तसेच मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेच्या माध्यमातून फिरता दवाखाना आहे. यामध्ये एकूण 33 पदे मंजुर आहेत. यातील केवळ 11 पदे भरण्यात आली आहेत. 21 कर्मचाऱ्यांची पदे शासकीय भरती होत नसल्याने रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे पशुधन विकास अधिकारी यांची 8 पदे, पशुधन पर्यवेक्षक यांची 7 अशी एकूण 15 महत्वाची पदे दवाखाना सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असताना भरली गेलेली नाहीत. 5 शिपायांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात सद्यस्थितीत तालुक्याच केवळ 3 पशधुन विकास अधिकारी व 3 पशुधन पर्यवेक्षक तालुक्याचा कारभार पहात आहेत.
तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात हा आकडा कार्यरत कर्मचाऱ्यांवर जास्तीचे कामाचा भार टाकणार आहे. पाळीव कुत्रे व मांजर हे प्राणी आजारी पडल्यास वा दुखापतग्रसत झाल्यास दवाखान्यात आणले जातात. गाई, म्हशी, बैल इत्यादी प्राण्यांना आजार झाल्यास पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवर व्हीजीटसाठी जावे लागते त्यात बराच वेळ वाया जातो त्यामुळे कर्मचारी भरतीचा रिक्त अनुशेष तातडीने भरुन काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाळीव पशुधनास गंभीर आजार झाल्यास अथवा तातडीने शस्त्रक्रीयेची आवश्यकता भासल्यास तशी सोय केवळ तालुक्याचे ठिकाणी उपलब्ध आहे. पाळीव पशुधनाचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी काल संगत गरजेच्या तांत्रीक साधनांचीही अडचणी होताना दिसून येत आहे याशिवाय विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार व प्रशासकीय कागदपत्रांचे सोपस्कर पुर्ण करण्यातही कर्मचाऱ्यांचा वेळ खर्च होतो.










