
दोडामार्ग : एसटी बस मधून गोवा बनवटीची अवैध दारू नेणाऱ्या एकावर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. सुरजबाशा बशीर अहमद तल्लूर (३१, रा. उगरखोड, ता. संपगाव, जि. बेळगाव) असे संशयीताचे नाव असून ८ हजार २०० रुपयांची दारू जप्त केली. मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तपासणी नाक्यावर ही कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी दोडामार्ग तपासणी नक्याला अचानक भेट देत दारू वाहतुकीवर कारवाई केली होती. यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाला दिले होत्या. या तपासणी नाक्यावर मंगळवारी सायंकाळी ४ वा. सुमारास आलेली एसटी बस तपासणीसाठी थांबविली. सर्व प्रवाशांची झडती घेतली असता सुरजबाशा बशीर अहमद तल्लूर याच्याजवळ गोवा बनावटीची अवैध दारू मिळाली. सर्व दारू जप्त करून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.