
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी स्मार्ट प्रीपेड वीज मीटरची सक्ती करू नये. सर्वसामान्य नागरिकांना हे मीटर परवडणार नाहीत. त्यासाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापूरे यांनी स्मार्ट मीटर वीज ग्राहकांच्या घरी बसविणार नाही असे सांगितले होते. मात्र कणकवलीत वीज ग्राहकांना न विचारता अदानी कंपनीचे कर्मचारी फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवित आहेत. हे आजपासून बंद झाले पाहिजे. जर स्मार्ट मीटर बसविताना अदानी कंपनीचे कर्मचारी आढळ्यास त्यांना शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापूरे व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना दिला.तसेच स्मार्ट मीटर बसविणार नाही असे लेखी पत्र देण्यास वैभव नाईक यांनी सांगितले. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे अदानी एनर्जी सोल्युशन अहमदाबाद या कंपनीला वीज ग्राहकांच्या संमत्ती शिवाय स्मार्ट मीटर न बसविण्याचे पत्र महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. तसेच कणकवली महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या अदानी कंपनीच्या कार्यालयात शिवसेना शिष्टमंडळाने धडक दिली.
कणकवली तालुक्यातील वीज समस्यांबाबत आज कणकवली महावितरण कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. तारापूरे व कणकवली कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी नागरिकांना स्मार्ट मीटरची सक्ती का करण्यात येत आहे. फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविले जात आहेत. कणकवली बांधकारवाडी येथे दत्तदर्शन अपार्टमेंट मध्ये नागरिकांना न विचारता १८ स्मार्ट मीटर बसविण्यात आले. अशाच पद्धतीने कामत सृष्टीतही ५० स्मार्ट मीटर बसविले आहेत याची विचारणा करण्यात आली. यावेळी अदानी कंपनीच्या व्यवस्थापकाला बोलावून सज्जड दम देण्यात आला. कणकवली विभागात १५ हजार मीटर बसविण्यात आले आहेत अशी माहिती अदानी कंपनीच्या व्यवस्थापकाने यावेळी दिली. याबाबत जाब विचारत जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे अधिकार अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता म्हणून तुमच्याकडे आहेत. आणि स्मार्ट मीटरला जिल्हावासियांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत असे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सांगण्यात आले. अदानीची दादागिरी जिल्हयात नको महावितरणचे खाजगीकरण करू नका असेही शिवसेना नेत्यांनी सुनावले.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामानात सारखे बदल होत असतात.तसेच विहीर अथवा नदीच्या ठिकाणी झाडांची सावली असते. ५ महिने सिंधुदुर्गात सातत्याने पाऊस असतो त्यामुळे सौर कृषीपंप जिल्ह्यात चालत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारेच कृषी पंप शेतकऱ्यांना द्यावेत.अशी मागणी शिवसेनेने केली. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. वायरमनची किती पदे रिक्त आहेत. याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच विद्युत वाहिन्यांवरील झाडी तोडण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, विद्युत पोल, वाहिन्या बदलणे, ट्रान्स्फार्मर बदलणे हि कामे पूर्ण करा अशा सूचना शिवसेना नेत्यांनी केल्या. त्यावर कार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठ कार्यालय व जिल्हा नियोजन मध्ये निधीसाठी प्रस्ताव केला असल्याचे सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुका संघटक राजू राठोड, शहरप्रमूख रुपेश नार्वेकर, राजू शेटये, महेश कोदे, बंडू चव्हाण, अनुप वारंग, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, प्रतिभा अवसरे, अजय सावंत, योगेश मुंज, अजित काणेकर, वैभव मालंडकर, संतोष पुजारे, रोहित राणे, नितीन राऊळ, अरुण परब, रामा राणे, लक्ष्मण हन्नीकोड, बाबू केणी, रवी परब, उद्धव पारकर, सार्थक ठाकूर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.