
सावंतवाडी : स्व. विकास सावंत यांनी जीवनाच्या वाटचालीत बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. तो पावलोपावली जाणवत राहील. त्यांनी ३५ वर्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे आर.पी.डीसह सर्व शैक्षणिक संकुल उंच स्थानकावर नेऊन ठेवले आहे. त्यांची शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी झटूया, शैक्षणिक,सहकार, आरोग्य, बांधकाम, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात काम दिशा देणारे असल्याने तो आमच्या समोर कायमच आदर्श राहील अशा शब्दांत शिक्षण प्रसारक मंडळ संचालक पदाधिकाऱ्यांसह सर्व शाळाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांना विविध शैक्षणिक संस्थांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सी एल नाईक, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही बी नाईक,संचालक अमोल सावंत, प्रा. सतिश बागवे, संदीप राणे, सिताराम गावडे, अँड शामराव सावंत, वासुदेव शिरोडकर, चंद्रकांत सावंत, प्रा.गिरीधर परांजपे , सोनाली सावंत, डॉ अशोक सुर्वे,लवू गावडे, राजेंद्र म्हापसेकर, संदीप राणे, नारायण देवरकर, चं.मु.सावंत, सोनाली सावंत, वसुधा मुळीक आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सचिव व्ही बी नाईक म्हणाले, विकास सावंत यांची उपस्थिती चैतन्य निर्माण करणारी होती. शैक्षणिक प्रगतीत त्यांनी संस्थांना उंचीवर नेऊन ठेवले. गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. कुटुंब प्रमुखाचा सन्मान राखला. भाईंचा समृद्ध वारसा त्यांनी जोपासला. ही संस्था शैक्षणिक संकुल निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता. समोरच्या व्यक्तीचं मन जिंकणारा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कधीही मनभेद होवू दिले नाहीत. त्यांच्यासारखा संस्था प्रमुख होणे नाही. सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे म्हणाले, भाईंच्या पश्चात त्यांनी अभुतपुर्व कामं केले. भाईचा समृद्ध वारसा जोपासला मात्र पदांसाठी तत्व सोडले नाही. त्यांनी अभ्यासपूर्ण काम करत कर्तृत्त्व निर्माण केले.
यावेळी रावजी यादव म्हणाले , जिल्हा परिषद सभापती म्हणून अभ्यासपूर्ण कामकेले.माजगावचा प्रतिनिधी म्हणून बोलताना चंद्रकांत सावंत यांनी माजी आरोग्यमंत्री कै भाईसाहेब सावंत आणि विकासभाईं यांच्या आठवणींना उजाळा दिला. वासुदेव शिरोडकर म्हणाले, विकासभाईनी विविध शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. त्यांना शिक्षणमहर्षी म्हटले पाहिजे. बाबा चांदेकर म्हणाले, पालकत्व स्वीकारणारे विकास सावंत होते. संस्था अध्यक्ष म्हणून कायमच प्रोत्साहन देणारे सर्व समावेशक व्यक्तिमत्त्व होते. जे बी नाईक महाविद्यालय प्राचार्य सौ ठाकूर, माजी प्राचार्य महादेव धुरी, चंद्रकांत सावंत, बाळासाहेब नंदीहल्ली, श्री. देवरकर, प्रा सतिश बागवे, रमाकांत जाधव, प्राचार्य संप्रवी कशाळीकर आदींनी विकास सावंत यांना श्रध्दांजली वाहिली. या श्रद्धांजली सभेस शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी, सर्व संचालक पदाधिकारी व सदस्य तसेच संस्था संचलित आर.पी.डी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ इंग्लिश स्कूल तसेच जे. बी. नाईक महाविद्यालय, शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान तसेच आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि परिवार उपस्थित होते.