अणाव रानबांबूळी व ओरोस ग्रामस्थांचे प्रश्न सोडवू

प्राधिकरणासह सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत करू : आमदार निलेश राणे
Edited by:
Published on: April 13, 2025 17:39 PM
views 104  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालयाच्या विकासामध्ये अणाव, रानबांबूळी व ओरोस गावांचे मोठे योगदान आहे.  त्यामुळे या गावातील जनतेचे प्रश्न प्रथम सोडवू. येथील जनतेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. या नगरपंचायतीतून प्राधिकरण क्षेत्र वगळले जाणार नाही याची पण काळजी घेऊ व लवकरच ही सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत करू अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी सिंधुनगरी आणव तळगाव जोडणाऱ्या रस्त्याच्या भूमी पूजन प्रसंगी बोलताना दिली.सिंधुदुर्गनगरीतील गरुड सर्कल ते जिल्हा कारागृह (अणाव) पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ आज ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढ़वून करण्यात आला.यावेळी बोलतांना निलेश  राणे यांनी सिंधुनगरी व लगतच्या गावांच्या विकासाबाबत भाष्य केले. सिंधुदुर्ग नगरी येथील गरुड सर्कल कडून जिल्हा कारागृहाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग अनेक वर्षे दुर्लक्षित राहिला. याची दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली. सिंधुदुर्ग नगरी वरून जिल्हा कारागृह लगत असलेले अणाव गाव या रस्त्यामुळे जोडले जाईल. पुढे तळगाव मार्गे मालवण हा रस्ता जुळला जाईल व सिंधुदुर्ग नगरी हे शहर या गावच्या आरती जवळ येईल म्हणूनच पक्ष न पाहता येथील सर्व ग्रामस्थांनी विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.

या संदर्भात लवकरच  तिन्ही गावांचे सरपंच,उप-सरपंच,सदस्य, प्रमुख व्यक्ती,कार्यकर्ते,यांच्याशी चर्चा करू, नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर प्राधिकरण क्षेत्र आणि या तिन्ही गावांना त्याचा कसा आणि किती लाभ होणार आहे हे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष त्यांना पाटवून देऊ, त्यांच्या शंकांचे निरसन करू असे आश्वासन ही राणे यांनी यावेळी बोलताना दिले.या विभागाचा आमदार या नात्याने प्राधिकरण आणि त्यासोबतच तिन्ही गावांचे प्रश्न सोडवणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

वेंगुर्ले शहराप्रमाणे प्राधिकरण क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प उभा राहिल्यास प्राधिकरण आणि तिन्ही गावांच्या कचराऱ्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अणाव येथील कचरा डेपो बाबत अनाव सरपंचांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, दादा साईल, महिला कार्यकर्त्या सुप्रिया वालावलकर,ओरोसचे सरपंच आशा मुरमुरे,  उप-सरपंच पांडू  मालवणकर, गौरव घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री नाईक, भक्ती पळसमकर, वनिता जुवेकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.