
दोडामार्ग : दोडामार्ग आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर असताना व प्रामुख्याने येथील जनतेची मागणी असताना दोडामार्गचे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम हे कासव गतीने सुरू आहे. येणाऱ्या दोन महिन्यात या उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करून जनतेला आरोग्य सेवा देण्यात यावी अन्यथा रुग्णालयाबाहेर जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्वराज्य संस्था सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
प्रवीण गवस यांनी बोलताना सांगितले की, दोडामार्ग येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम हे २८ डिसेंबर २०२२ रोजी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. आणि हे उपजिल्हा रुग्णालयाचे काम पुढील २४ महिन्यात अर्थात दोन वर्षांत पूर्ण करण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. मात्र आता दोन वर्ष पूर्ण होऊन तीन वर्ष उलटायला आलीत तरी देखील काम अर्धवट स्थितीत आहे. काम करण्यासाठी नेमण्यात आलेला ठेकेदार हा जाणून बुजून कामावर दुर्लक्ष करत आहे असाही आरोप यावेळी प्रवीण गवस यांनी केला. शिवाय कार्यारंभ आदेश केव्हा देण्यात आले आहेत याबाबतचे लेखी पुरावे ही यावेळी गवस यांनी पत्रकारांशी बोलताना दाखविले आहेत.
इमारतीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष...
यावेळी गवस म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही आहे. त्यांनी आपल्या कार्यालयाची अर्थात सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची इमारत वेळेत पूर्ण करून घेतली मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली उपजिल्हा रुग्णालयाची इमारतीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी गवस यांनी केला आहे. त्याशिवाय काम चालू करण्यापूर्वी कामाची संपूर्ण माहिती, कामाचे नाव, कामाचा थोडंक्यात वाव, कार्यारंभ आदेश दिनांक, कामाची मुदत इत्यादी विषयक फलक लावणे ही बंधनकारक आहे मात्र तसे ठेकेदाराने केले नाही आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे करूनही घेता आले नाही आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम बांधकाम विभाग करत आहे असेही गवस म्हणाले.
सां. बां.ने तात्काळ लक्ष घालावे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून या इमारतीचे काम पूर्ण करून घ्यावे. व येथील जनतेला लवकर सुविधा द्याव्यात अशी मागणी गवस यांनी केली आहे. शिवाय येणाऱ्या दोन महिन्यात काम पूर्ण न केल्यास तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी श्री. गवस यांनी दिला आहे.










