दांडेली-वरचावाडात दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 12:59 PM
views 46  views

सावंतवाडी : दांडेली-वरचावाडा येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार दिसून आला. चार दिवसात तीन कुत्री बिबट्याने फस्त केली. यात एक कुत्रा बचावला. भर वस्तीजवळ बिबट्याचा सुरू असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी केली आहे. 

वरचावाडा येथील परेश दाभोलकर यांच्या घराजवळ गेले चार दिवस बिबट्याचे दर्शन होत आहे. घरानजीक रानटी प्राणी आल्याने लहान मुलांना बाहेर फिरणे पण धोकादायक बनले आहे. गेल्या चार दिवसात बिबट्याने एक एक करून तीन कुत्री फस्त केली. तर सूर्या नाईक यांचा कुत्रा बिबट्याच्या तावडीतून बचावला. दिवसा ढवळ्या बिबट्याचा घरानजिक सुरू असलेला संचार भीतीदायक आहे. त्यामुळे वनविभागाने सदर बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी दांडेली माजी उपसरपंच योगेश नाईक यांनी केली आहे.