
सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेला तो बिबट्या वन्य प्राणी उपचार केंद्रात कराड सातारा येथे उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत झाला. याबाबत सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी बिबट्याने चौघांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्या बिबट्याला वनविभागाच्यावतीने जेरबंद करण्यात आले होते. हा बिबट्या काहीसा आजारी आणि जखमी असल्याने त्याला उपचाराकरता सातारा कराड या ठिकाणी वन्य प्राणी उपचार केंद्रात मंगळवारी हलवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी तो मृत्यू पावला. या संदर्भात येथील वनविभागाचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांना विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना त्या बिबट्याचे निधन झाले. हा बिबट्या हा उपाशी असल्याने तसेच त्याला जेरबंद करताना त्याने केलेला प्रतिकार हे सर्व गोष्टी पाहता त्याच्या अंगावर काहीशा जखमा झाल्या होत्या. पंजानाही जखमा होत्या. तसेच तो पूर्णपणे भुकेला असल्याने अस्वस्थ झाला होता. एकूणच यातूनच त्याचे निधन झाल्याचे समोर आले आहे. तो जवळपास आठ वर्षाचा, नर जातीचा बिबट्या होता.