पाळयेत बिबट्याने पाडला बकऱ्यांचा फडशा

Edited by:
Published on: March 24, 2025 18:44 PM
views 120  views

दोडामार्ग : पाळयेत बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडला. यात शेतकरी चिमणू गंगाराम वरक यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी चिमणू वरक यांनी केली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, पाळये येथील शेतकरी चिमणू गंगाराम वरक हे शेळी पालन करतात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी रात्री शेळ्यांच्या गोठ्यात बकऱ्या ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने वरक कुटुंबीय जागे झाले. सावधगिरी बाळगत त्यांनी गोठ्याजवळ जाऊन पाहिले असता एका बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या वरक कुटुंबियांवरही चाल करून येत होता. मात्र त्यांनी स्वतःला व कुटुंबीयांना मोठ्या चपळाईने वाचविले. काही क्षणातच बिबट्याने जंगलात धूम ठोकली. त्यानंतर गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसले. शासनाने नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी वरक कुटुंबाने केली आहे. सोमवारी सकाळी दोडामार्ग वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.