
वैभववाडी : लोरे नं २ येथील माध्यमिक विद्यालयाच्या मागील पडक्या विहिरीत पडून नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार आज ता.२८ रोजी सकाळी ११वा शाळकरी विद्यार्थ्याच्या निदर्शनास आला. वनविभागाने बिबट्याला बाहेर काढून त्यांच्यावर करुळ येथे अंतिम संस्कार केले. पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
लोरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आज सकाळी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होते. या दरम्यान त्यांचा चेंडू शाळेच्या मागील बाजूला असलेल्या विहीरीकडे गेला. चेंडू शोधताना त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले असता, विहीरीत बिबट्या तरंगताना दिसला. त्यांनी ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन खात्री केल्यानंतर गावचे पोलीस पाटील लहू रावराणे यांना याबाबत कळविले. पोलीस पाटलांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर, वनपाल हरी लाड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून त्याच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या करुळ तपासणी केंद्रानजीक त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वन क्षेत्रपाल राजेंद्र कुणकीकर, वैभववाडी वनपाल हरी लाड, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, अतुल खोत यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मृत पावलेला बिबट्या हा तीन ते चार वर्षांचा होता. भक्ष्याच्या शोधात तो विहीरीत पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.