
वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने कालेलकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि त्यांचे स्नेही रविप्रकाश कुलकर्णी यांचे "कालेलकर - लेखक आणि माणूस" हे व्याख्यान आज रविवार १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून कालेलकर यांच्या आठवणी जागवण्यात येणार आहेत.
रविप्रकाश कुलकर्णी यांची खरी ओळख उत्तम वाचक म्हणून आहे. ते जवळपास पन्नास वर्षे वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यातून नियमितपणे लेखन करत आहेत. ललित या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या साहित्यविषयक मासिकात १२ वर्षांहून अधिक काळ इथे-तिथे हे सदर सुरू आहे. मराठी साहित्य जगातील त्यांचा पदरमोड करून चालू असलेल्या संचारामुळे ह्या क्षेत्रातील रंजक कथा, घडामोडी, विस्मृतीत गेलेल्या लेखकांच्या कार्याचा उजाळा ते कर्तव्यभावनेने आणि रसिकतेने शब्दबद्ध करत असतात. अनेक नामवंत प्रकाशनसंस्थांसाठी ते पुस्तकांची प्रकाशनपूर्व निवड करतात, संपादन करतात. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व वेंगुर्ल्यात जन्मलेल्या मधुसुदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासक प्रशांत पानवेकर मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.