
मालवण : जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच पदासाठी सर्वसाधारण राखीव असे आरक्षण पडल्याने भाजपा आणि ठाकरे गट यांच्यात इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळणार आहे. सरपंच आणि 13 सदस्य संख्या असलेल्या तालुक्यातील एकमेव अशा या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होत असल्याने भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची मुदत 20 एप्रिल 2023 रोजी संपली होती. त्यानंतर प्रशासकाच्या हाती ग्रामपंचायतचा कारभार गेला होता. आता ही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. 23 तारिखला अर्जांची छाननी होणार आहे. 25 ऑक्टोबरला 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येणार असून 5 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर 7 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
आचरा ही मालवण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 2018 साली झालेल्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विरुद्ध शिवसेना भाजपा युती अशी थेट दुरंगी लढत झाली होती. त्यावेळी स्वाभिमान पक्षाकडून प्रणया टेमकर तर शिवसेना भाजपा युतीकडून ललिता पांगे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत स्वाभिमान पक्षाने शिवसेना भाजपा युतीचा दारून पराभव केला होता. सरपंचसहित 8 सदस्य निवडून आणत ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता मिळविली होती. मात्र, यावेळी राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. नारायण राणे भाजपात गेले आहेत. तर राज्यस्तरावर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत थेट लढत होण्याची शक्यता आहे.
निलेश राणे, वैभव नाईकांची प्रतिष्ठा पणाला :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा ग्रामपंचायत निवडणूक ही भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे आणि ठाकरे गटाकडून आमदार वैभव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीला जरी उशीर असला तरी दोघेही मतदारसंघात ठाण मांडून असतात. त्यात आचरा ही मालवण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे जनमताचा कौल कुणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही जरी गाव पातळीवरील लढवली जात असली तरी त्या त्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची ती परीक्षा असते. विधानसभा निवडणुकीपूर्वीची गावपातळीवरील ही मोठी निवडणूक असल्याने दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरपंच पदासाठी 'या' नावांची चर्चा :
थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सरपंच पदासाठी सर्वसाधारण राखीव आरक्षण पडले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक असणार आहेत. भाजपा कडून माजी जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडीस, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, जगदीश पांगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यानंद परब, अनुष्का गावकर, काँग्रेसकडून चंदन पांगे यांच्या नावाची चर्चा आहे.
मंगेश टेमकर यांची भूमिकाही महत्वाची :
आचऱ्याचे माजी सरपंच मंगेश टेमकर यांचीही भूमिका महत्वाची असणार आहे. मागील निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मंगेश टेमकर यांची मुलगी प्रणया टेमकरने निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आता स्वतः मंगेश टेमकर हे सुद्धा सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ? की अपक्ष लढणार ? याचीही चर्चा सुरु असून मंगेश टेमकर यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेस काय करणार ? :
आचऱ्यात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटासोबत निवडणूक लढणार याचीही चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची फारशी ताकद नसली तरी आगामी लोकसभा, विधानभसा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे सुद्धा महत्वाचे आहे.