इंग्रजी शिकणे कठीण नाही फक्त सातत्य हवं : जयंत मणेरीकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 18, 2025 18:18 PM
views 24  views

देवगड : इंग्रजी शिकणे कठीण नाही,फक्त सातत्य आणि सराव आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुशल अकॅडमीचे अध्यक्ष जयंत मणेरीकर यांनी केले. दीक्षित फाउंडेशन व कुशल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

जयंत मणेरीकर पुढे म्हणाले की, इंग्रजी बोलण्याच्या कोर्सच्या मदतीने आपण स्वतःला अधिक सक्षम करू शकतो आणि जागतिक स्तरावर यश मिळवू शकतो.

जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या नलावडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सांगता समारंभात विचारमंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, राहुल गोगटे, वैशाली मणेरीकर आदि मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक सुनील जाधव म्हणाले की, सध्याच्या युगात इंग्रजी ही जगाची मुख्य भाषा झाली आहे. त्यामुळे चांगले इंग्रजी येणे ही काळाची गरज बनली आहे. इंग्रजी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होते. ही भीती दूर करण्याचे काम दीक्षित फाउंडेशन आणि कुशल अकॅडमीच्या “ इंग्लिश कम्युनिकेशन ट्रेनिंग” या उपक्रमामुळे झाली  असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली मणेरीकर यांनी केले. विद्यार्थ्यांमधून अपूर्व बापट, आर्या मणचेकर, प्रियंका माळी, राधिका वालकर, उदी कुलकर्णी, वेदश्री गोगटे, सार्थक कर्ले, वेद गोगटे तर पालकांमधून सौ.तांबे, सौ.गोगटे व श्री.कर्ले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रज्ञा चव्हाण यांनी केले.