एसटीत गळती ; मनसेनं वेधलं लक्ष !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 29, 2024 11:21 AM
views 174  views

देवगड : देवगड एसटी आगारातील काही प्रवासी गाड्यांमध्ये पावसात एसटीच छप्पर लीक झाल्यामुळे गळती होत आहे. ती तात्काळ थांबवावी व प्रवाशांना सुखर पावसाळी हंगामात सेवा द्यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी शिष्टमंडळाद्वारे देवगड आगार व्यवस्थापक यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री, तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, सचिव जगदीश जाधव, राजन पवार, संतोष जाधव, अजय कातवणकर, तेजस खोत, नंदकिशोर हडकर, शरद आचरेकर, सुनील खोत,अशोक पवार, उदय जाधव आदी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी आगार व्यस्थापकांशी झालेल्या चर्चेत गाडयाची गळती काढण्याचे काम सुरू असून सुस्थितीत गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरूअसल्याची माहिती देण्यात आली. या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, देवगड आगारांमधील गाड्या या प्रवासी वाहतूक करीत आहेत. परंतु त्यामधील ४ ते ५ गाड्या या पावसाळी हंगामामध्ये वाहतूक करताना सदर गाड्यांमध्ये पाण्याची गळती होते. त्यामुळे प्रवासी बसलेले असताना त्यांचे अंगावर पाणी पडून तसेच बसण्याच्या सर्व सीट ओल्या होण्याचे प्रकार घडत आहे. तसेच प्रवाशांचे ठेवलेले सामानही भिजले जाते, तरी त्या गाड्यांची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी यापूर्वीही पावसाच्या हंगामामध्ये असाच प्रकार घडला होता. याची पूर्वकल्पना देऊन काही गाड्या दुरुस्त करूनही घेतल्या होत्या. तरी प्रत्येक पावसाळी हंगामामध्ये ही बाब निदर्शनास आणून देण्यापेक्षा प्रत्येक पावसाळी हंगामाअगोदर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसे होत नसून प्रवाशांचे हाल कदापि सहन करणार नाही असा इशाराही या शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक यांना दिला आहे .