
शिरगांव : पहाटेच्या दरम्यान शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला. पन्नासहून अधिक भक्त जखमी. जखमींमध्ये धोंडांचाही समावेश आहे.
शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर म्हापसातील जिल्हा इस्पितळात ३० जणांना दाखल केले होते. त्यातील ४ भाविकांचा मृत्यू झाला. डिचोली रुग्णालयात दोन भाविकांचा मृत्यू झाला. जखमींना म्हापसा, डिचोली आणि गोमेकॉत दाखल केले आहे. गोमेकॉत सध्या ६ जणांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली आरोग्य केंद्राला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाला भेट दिली.
मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही म्हापसा येथील इस्पितळाला भेट दिली.
थिवी येथील तिघांचा मृत्यू
शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी येथील नात्यातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आदित्य कवठणकर (१७, अवचीतवाडो), तनुजा कवठणकर (५२) आणि यशवंत केरकर (४०, माडेल, थिवी) यांचा समावेश आहे.
होमखंडकडे जाताना युरुवातीला दोघेजण जमिनीवर पडले. त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली. यावेळी रस्त्याच्या कडेच्या दुकानांवर धोंड भाविक कोसळले. दुकानांना वीज पुरवठा होत असलेल्या वायर तुटल्यामुळे काहींना विजेचा करंटही लागल्याची शक्यता आहे. काही लोक कोयते आणि इतर अवजारे विकणाऱ्या दुकानांवर कोसळल्यामुळे जखमी झाले. पहाटे ३ च्या दरम्यान ही घटना घडली. जत्रेला सुमारे २ लाख लोक उपस्थित होते. पोलिसांनी सतर्क होऊन प्रकरण हाताळण्याचे पूर्ण प्रयत्न केले.