'लाडकी बहीण'साठी जिल्हा बँकेत 'झिरो बॅलेंस' खाते सुरु होणार

अध्यक्ष मनीष दळवी यांची घोषणा !
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 06, 2024 12:51 PM
views 206  views

सिंधुदुर्गनगरी :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने आपल्या सर्व शाखांमध्ये महिलांना आवश्यक असलेले बँक खाते शून्य बॅलन्स ने उघडण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करण या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या नाव नोंदणीसाठी दि.०१ जुलै २०२४ पासून सुरूवात झाली असून दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभाथ्यर्थ्यांचे अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना दर महिना रक्कम रूपये १ हजार ५०० महाराष्ट्र शासन जुलै २०२४ पासून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. या कामासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षीका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक तर नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व पोर्टलवर अपलोड करण्याचे काम देण्यात आले आहे.


केंद्र व राज्य शासनाच्या सर्व लोकाभिमुख योजना राबविण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बंक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. महाराष्ट्र शासनाची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना सुध्दा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या सर्व ९८ शाखांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि डीबीटी आधार लिंकींग असणे गरजेचे आहे. त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत परंतू ज्यांनी अजून बचत खाते उघडलले नाही अशा महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून "झीरो बॅलन्स" ने बचत खाते उघडण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त महिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेमध्य आपले बचत खाते सुरू करावे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत खाते असलेल्या महिलांनी शाखेला भेट देवून आपले खाते आधार लिंक करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.