
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या जिल्ह्यातच मोफत पाठ्यपुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाहीत. जिल्हा परिषद, सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळांतील ७० हजार लाभार्थी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत, पण सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पुस्तके मिळाली नाहीत, असे समोर आले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत ७० हजार पाठ्यपुस्तके उपल्ब्ध करून देण्यात आली आहेत असे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी आज सांगितले. सरसकट सर्व शाळांत पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याबाबत सखोल चौकशी करून पाठपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. चार टप्प्यात पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून पहिल्या चाचणीसाठी सर्व विषयांचे एकच पुस्तक त्यामध्ये नोट वही अशी नवी रचना करण्यात आली आहे. नवे पाठ्यपुस्तक व नोंदवही असे नवे स्वरूप विद्यार्थी, शिक्षकांच्या अंगवळणी पडताना दिसत नाही. पुस्तकाच्या रचनेमध्ये एक धडा आणि एक नोंद वही, कोरे पान असे स्वरूप आहे. एकाच पुस्तकात सर्व विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. वर्षभरात प्रत्येक घटक चाचणी नुसार एक पुस्तक सर्व विषयांचे असणार आहे. शासनाने चारही टप्प्यातील पुस्तकांची निर्मिती केली असून त्यांचे वितरण शाळांमध्ये करण्यात आले आहे. मात्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या पुस्तकांचे वितरण झालेलेच नाही.