
सिंधुदुर्गनगरी : सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी परीक्षेत विद्यामंदिर कुसबे शाळेचा इ. ५ वीचा विद्यार्थी श्रीजय अनाजी हरमलकर याची नवोदय विद्यालय, सांगेली येथे निवड झाली आहे. तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत इ. ४ थीचा विद्यार्थी वेदांत विजय साठे याने ३०० पैकी २६८ गुण मिळवून कुडाळ तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. वेदांतची गोवा सायन्स सेंटर सफरीसाठी निवड झाली आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासून सुरू केलेले मार्गदर्शन वर्ग, नियमित साप्ताहिक सराव चाचण्या यामुळे विद्यार्थी हे यश संपादन करू शकले. मार्गदर्शक वैशाली साठे व गजेंद्र राणे, शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग व कुसबे ग्राम विकास मंडळ, मुंबई यांचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे मुख्याध्यापक अप्पासाहेब हरमलकर यांनी सांगून ही यशाची परंपरा कायम चालू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या यशाबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे पोखरण नं.१ केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर, पोखरण-कुसबे सरपंच समीक्षा जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूर्वा सावंत, मुख्याध्यापक अप्पासाहेब हरमलकर, कुसबे पोलिस पाटील भाग्यश्री गांवकर, ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष योगेश घाडीगांवकर, विद्यामंदिर कुसबे अमृत महोत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र घाडीगांवकर व सचिव नितीन महाडेश्वर यांनी अभिनंदन केले आहे.