कणकवली तालुक्यात कुणबी, कुणबी - मराठा, मराठा - कुणबी ३९९५ नोंदी

जात दाखल्यांसाठी पुराव्यांसह अर्ज करा | कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 20, 2024 05:26 AM
views 284  views

कणकवली : शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या ४५ गावांमध्ये या नोंदीची माहिती तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली असून ज्यांना त्या अनुषंगाने जात दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या रेकॉर्डनुसार ४५ गावांमध्ये कुणबी अथवा कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत. १८९७ पासूनच्या या नोंदी सापडल्या असून ४५ गावांमध्ये एकूण ३९८६ कुणबी, कुणबी-मराठा ७ व मराठा-कुणबी २ अशा ३९९५ नोंदींचा समावेश आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार संबंधीत नोंदीनुसार लाभार्थ्यांना जात दाखले देण्यात येणार आहेत. यासाठी त्या ४५ गावांमध्ये तलाठी कार्यालयांच्या ठिकाणी या नोंदी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधीत लाभार्थ्यांना जर जातीचे दाखले हवे असतील तर त्यांनी या पुराव्यांसहीत अर्ज सादर करावयाचा आहे. तलाठी पातळीवरूनही अर्जाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. याबाबतची सुरूवातही शुक्रवारपासून करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना दाखले हवे आहेत, त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.