कुडाळात दस्ताऐवजामध्ये 'कुणबी' नोंद शोध मोहीम !

तहसीलदार अमोल पाठक यांची माहिती
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 08, 2023 18:17 PM
views 569  views

कुडाळ : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी ही नोंद शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली असून कुडाळ तालुक्यात गेले पाच दिवस कुणबी ही नोंद दस्ताऐवजामध्ये शोधली जात आहे मात्र अद्याप कोणत्याही दस्ताऐवजांमध्ये ही नोंद सापडून आलेली नाही अजून काही दस्तऐवज तपासले जातील अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला त्यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी ही नोंद ज्या ठिकाणी ज्याच्याजवळ आढळून येईल त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यासाठी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रशासनाच्या दस्तऐवजामध्ये कुणबी ही नोंद शोधली जात आहे.

कुडाळ तहसील कार्यालयामध्ये महसूल दस्तऐवजामध्ये सुद्धा ही नोंद शोधली जात असून १९६७ पूर्वीचे जन्म, मृत्यू नोंद दस्ताऐवज तसेच सातबारा, बोटखत याची पडताळणी केली जात आहे. गेले पाच दिवस कुडाळ तालुक्यामध्ये या नोंदी बाबत कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र अद्याप एकाही दस्ताऐवजामध्ये कुणबी अशी नोंद सापडून आलेली नाही अजून काही दस्ताऐवज तपासणे बाकी असून हे दस्तऐवज तपासल्यानंतर कुडाळ तालुक्यात कुणबी या जातीची नोंद आहे का? हे समजणार आहे. अशी माहिती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली आहे.