
कुडाळ : "मानसिक ताणतणावामुळे आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. निरोगी जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून अशा आरोग्य शिबिरांची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन बांबुळीचे सरपंच श्री. प्रशांत परब यांनी केले. ग्रामपंचायत बांबुळी आणि शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत बांबुळी गावामध्ये शुक्रवारी, १९ डिसेंबर २०२५ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील तब्बल ९० ग्रामस्थांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
विविध आजारांवर मोफत उपचार आणि मार्गदर्शन या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar), ईसीजी (ECG), कोलेस्ट्रॉल आणि रक्तगट तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधोपचारही देण्यात आले. विशेषतः नेत्र तपासणी दरम्यान ज्या ग्रामस्थांना मोतीबिंदूचा त्रास आढळला आहे, त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील नेत्र विभागात पाठवण्यात येणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ
आरोग्य तपासणीसोबतच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभही यावेळी देण्यात आला: आयुष्यमान कार्ड: ज्या ग्रामस्थांकडे अद्याप आयुष्यमान कार्ड नव्हते, त्यांना या शिबिरात नवीन कार्ड काढून देण्यात आली. वय वंदना योजना: ७० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेची माहिती देऊन, ५ लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षिका गायत्री धुरी यांचा विशेष सत्कार
या कार्यक्रमाचे औचित्य साधून बांबुळी गावचे नाव उंचावणाऱ्या सौ. गायत्री गुरुनाथ धुरी (पदवीधर शिक्षिका, जि.प. शाळा बांबुळी) यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्रात पार पडलेल्या ३४ व्या 'पश्चिम भारत विज्ञान जत्रा' महोत्सवात त्यांच्या 'Maths Magic Box' या प्रतिकृतीला शिक्षक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या दैदिप्यमान यशाबद्दल सरपंच व सर्व सदस्यांनी त्यांचे कौतुक केले.
या शिबिरासाठी शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉ. रवी वाघमारे (CMO), डॉ. अपर्णा चिपळूणकर (MCO), डॉ. सौरभ बालम (नेत्रतज्ज्ञ) यांच्यासह आरोग्य कर्मचारी श्रीम. गौरी दळवी, चिन्मय कामत, रोहित हरमलकर, सिद्धेश परब, सुहानी मांजरेकर, मान्यता कुंटे, प्रीती सावंत, प्रदीप परब, किरण निकम आणि सौ. मस्के मॅडम यांनी आपली सेवा दिली.
कार्यक्रमाला उपसरपंच प्रा. सुभाष बांबुळकर, ग्रा. प. सदस्य बच्चूजी मेस्त्री, सायली परब, दीपश्री परब, ग्रामविकास अधिकारी कु. रूपवते मॅडम, मुख्याध्यापक मारुती गुंजाळ, माजी सरपंच श्रीम. दीप्ती परब, शरद परब, भुजंग परब, वसंत तेली, प्रज्ञा परब, शालेय समिती अध्यक्ष प्रमोद बांबुळकर व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच प्रा. सुभाष बांबुळकर यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.










