कासार्डेतील युवतीच्या मृत्यूला डॉ. नागवेकर हॉस्पिटल जबाबदार

उच्चस्तरीय चौकशी - कारवाईची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 20, 2025 11:14 AM
views 334  views

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील युवती कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या मृत्यूला कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमधील चुकीच्या उपचार पद्धती जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कासार्डे व तालुक्यातील नागरिकांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर महाराष्ट्र नर्सिंग होम नियम 2001 नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यानंतर या संताप्त ग्रामस्थांनी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडेही निवेदन सादर केले. 

निवेदनानुसार, कस्तुरी पाताडे हिला उपचारासाठी कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे झाल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेनंतर संतप्त कासार्डे ग्रामस्थ माहिती घेण्यासाठी कणकवली येथे आले असता, डॉक्टर नागवेकर यांच्या पत्नी कीर्ती नागवेकर यांनी ग्रामस्थांशी धक्काबुक्की केली तसेच चप्पल काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांना सांत्वन देण्याऐवजी डॉक्टरांनी उर्मट वर्तन केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, कीर्ती नागवेकर यांनी “ऑपरेशन मीच केले” असे जाहीरपणे सांगत जमावाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. यामागे जमाव प्रक्षुब्ध होऊन रुग्णालयाचे नुकसान झाल्यास सहानुभूती मिळवण्याचा हेतू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद कासार्डेसह संपूर्ण तालुक्यात उमटत असून नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी चुकीची माहिती पसरवून प्रत्यक्ष घटनेपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

डॉ. नागवेकर हॉस्पिटलबाबत यापूर्वीही अनेक रुग्णांच्या तक्रारी असून त्यासंबंधीचे व्हिडिओ व संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. याच प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर अनंत नागवेकर व डॉक्टर मयूर नागवेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून कीर्ती नागवेकर यांनीही ऑपरेशन आपणच केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ऑपरेशन कोणी केले, ते पात्र डॉक्टर होते की शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कस्तुरी पाताडे हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, तसेच या रुग्णालयातील कथित आर्थिक व वैद्यकीय पिळवणूक थांबवण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी ठाम मागणी कासार्डे व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर,माजी सरपंच संतोष पारकर,कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, संजय पाताडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी बंड,सहदेव खाडये, श्रीपत पाताडे,नामदेव पाताडे,वारगाव सरपंच नाना शेटये,दिपक सावंत,प्रणिल शेटये यांच्या सह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग नगरीत एकवटले होते.