सातवा वेतन आयोग ; वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटीची अवमान याचिका

सिंधुदुर्गातील शिक्षक सहभागी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 09, 2025 19:29 PM
views 84  views

कुडाळ : सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्रातील तिन्ही उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. राज्यातून सुमारे 400 ते 4500 हजार शिक्षक या याचिकांमध्ये सामील झाले होते. न्यायालयाने शासनाला वेतनत्रुटि समिती स्थापन करून वेतन त्रुटी 30.06.2023 पर्यंत दूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र विहित वेळेत वेतनत्रुटि दूर केली नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेतील शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे.

सदरील याचिकेची दि. 1 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे सुनावणी करिता निघाली. मा न्यायालयाने शिक्षण विभाग,  वित्त विभाग,  ग्रामविकास विभागाचे सर्व सचिव तसेच वेतन त्रुटी समितीच्या सदस्यांनाही या शिक्षकांची वेतन त्रुटी का दूर केली नाही याबाबत खुलासा सादर करावा अशी नोटीस काढली आहे.

एकाच वेळी 4-4 मुख्य सचिवांना अवमान याचिकेत नोटीस काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.त्यामुळे या सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होऊ शकते अशा आशा पल्लवित झालेल्या आहेत. तसेच दि.15 डिसेंबर 2025 रोजी याची पुढील सुनावणी लगेच होणार असल्याचे संतोष वारंग यांनी कळविले आहे.