
कुडाळ : कुडाळ - मालवण वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८.०० वाजता कुडाळ आगारातून कुडाळ - मालवण बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी वरील मागण्यांबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली.
कुडाळ ते मालवण नियमित प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. शिवाय मालवण हा पर्यटन तालुका असल्यामुळे अनेक पर्यटक कुडाळमार्गे मालवणला येत असतात. परंतु कुडाळ - मालवण बसफेऱ्या फार कमी असल्यामुळे त्यांना अनेकदा गैरसोय होते. तसेच अनेक शासकीय कर्मचारी, शिक्षक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कुडाळ आगारातून मालवणसाठी सुटणारी वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८ वाजता कुडाळ - बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. तसेच कुडाळ आगाराच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, उप तालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, शिवसेना नेते संजय पडते, काका कुडाळकर, शिवसेना उपशहरप्रमुख चेतन पडते, युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे, शिवसैनिक संदेश सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.











